यमाष्टकम : कर्म, धर्म, व उत्क्रांतीचं रहस्य उलगडणारं अष्टक
आता यमाष्टक समजून घ्यायचं असेल तर आधी 'यम' म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. 'यम' हा शब्द 'यमन' या शब्दातून निर्माण झाला. मनाला नियंत्रित व संयमित करून चांगलं वळण लावणे म्हणजेच यमन करणे होय आणि हे यमन ज्याने सर्वप्रथम केलं तो म्हणजे यम. यमाष्टकाची सुरुवात ही परमेश्वराच्या पंचकृत्यांच्या उल्लेखाने होते. ही समस्त सृष्टी या पंचकृत्यांवर आधारित आहे. मानवाची उत्क्रांती ही त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते आणि ही 'नीतिमत्ता' हा या यमाष्टकाचा गाभा आहे.
निष्कारण भीती, मानवाचं अज्ञान व नकारात्मक दृष्टिकोनातून पसरलेल्या असंख्य गैरसमजांमुळे यमधर्म आपल्या सर्वांपासून आधीच दुरावलेले आहेत. महर्षी वेद व्यासांनी रचलेलं यमाष्टक व पतिव्रता सावित्रीने रचलेलं यमाष्टक या नंतर यमधर्मांवर आधारित कोणत्याही प्रकारच्या नवीन धार्मिक साहित्याची रचना केली गेली नाही. यमधर्मांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे संस्कृत भाषेत उपलब्ध असलेली यमाष्टकं आज आपल्या नित्य पठणात नाहीत. यमधर्मांबद्दल असलेली भीती, अज्ञान व गैरसमज दूर करण्यासाठी लेखकाने यमाष्टकाची रचना केलेली आहे.
यमाष्टकात लेखकाने 'कर्म', 'कर्मगती' व 'कर्माशय' या संकल्पनांचा उल्लेख केलेला आहे. 'कर्म', 'कर्मगती' व 'कर्माशय' या संकल्पनांचा अर्थ वाचकांना नीट समजावा म्हणून लेखकाने 'योग वाशिष्ठ' व 'पतंजली योग दर्शन' या दोन प्राचीन ग्रंथांतले विविध संदर्भ दिलेले आहेत.
यमाचा व उत्क्रांतीचा संबंध काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यमाष्टकात सापडतं, यमाचं स्वरूप, यमाचे दोन श्वान, वैतरणी नदी, यमाचा रेडा या यमाशी संबंधित असलेल्या प्रतीकात्मक पैलूंवर देखील यमाष्टक भाष्य करतं.
माणसाला वाटतं की जे सुख त्याला मिळतं आहे ते एखाद्या गोष्टीमुळे किंवा ती गोष्ट मिळवून देणाऱ्या साधनांमुळे मिळतं आहे आणि यामुळे तो त्या सुख देणाऱ्या गोष्टीचा किंवा ती गोष्ट मिळवून देणाऱ्या साधनांचा संग्रह करत राहतो. मनुष्याच्या या संग्रह करण्याच्या सवयीला 'परिग्रह' म्हणतात, आणि माणसाने अनावश्यक अशा गोष्टींचा व साधनांचा संग्रह न करणे म्हणजे 'अपरिग्रह'. लेखकाने यमाष्टकातल्या 'अपरिग्रह' या संकल्पनेवर फार भर दिलेला आहे व मानवी जीवनात अपरिग्रहाचं महत्व काय हे देखील स्पष्ट केलं आहे.
शेवटी, सामान्य माणसाच्या मनातून यमधर्मांबद्दल असलेली भीती व गैरसमज दूर करण्याचं आपलं ध्येय यमाष्टकम यशस्वीरीत्या साध्य करतं. विविध प्राचीन ग्रंथातले संदर्भ देऊन लेखकाने अध्यात्म व तत्वज्ञानाच्या जटिल संकल्पना अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळे ज्या वाचकांना व जिज्ञासूंना यमधर्मांबद्दल व नीतिमत्ता, कर्म, इत्यादी संकल्पनांबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आदित्य शेंडे लिखित यमाष्टकम हे अतिशय उत्तम व उपयुक्त संसाधन आहे.
पुस्तकाचे नाव: यमाष्टकम
लेखक: आदित्य विवेक शेंडे
प्रकाशक: हेडविग मीडिया हाऊस
पृष्ठसंख्या: ४०
© वेदांग देशपांडे
Comments
Post a Comment