माणूस नावाचं सुंदर शिल्प: यशाची व व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली


पुस्तकाचे लेखक हे भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल आहेत. १९७१ साली ते भारतीय सेनेत जेव्हा अधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा पासून 'मानवी विकास आणि प्रतिसाद' हा त्यांचा आवडीचा विषय आहे. लेखकाने आयुष्यातील वेगवेळ्या टप्प्यांवर म्हणजेच बालपणापासून ते प्रौढत्वा पर्यंत माणसाच्या वागण्याचा, स्वभावाचा व तो देत असलेल्या प्रतिसादाचा बारकाईने अभ्यास केलेला आहे.

असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं आणि माणसातले गुण-दोष हे अधून मधून डोकं वर काढतात. पण जर मुक्या प्राण्यांना प्रशिक्षण देऊन बदलता येऊ शकतं तर हे माणसाच्या बाबतीत पण सहज शक्य आहे. आणि या सकारात्मक बदला करता गरज आहे चांगल्या वातावरणाची आणि सहेतुक व सातत्यपूर्ण परिश्रमाची.

हल्लीच्या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला एका विशिष्ठ चौकटीत बांधून ठेवलं आहे. अमुक अमुक एक अभ्यासक्रम आणि अमुक अमुक एवढे गुण तुला परीक्षेत मिळाले की तू हुशार. थोडक्यात सांगायचं झालं तर आजची शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी नाही तर परीक्षार्थी घडवत आहे. एक चांगला विद्यार्थी असणं हे सुजाण नागरिक होण्याच्या प्रक्रियेतील पाहिलं पाऊल आहे.

लेखकाच्या अनुसार 'मानवी विकासाचे' बुद्धी, भावना, जीवन कौशल्य, ज्ञान, शारीरिक क्षमता हे पाच आधार स्तंभ आहेत. जरी हे पाच स्तंभ वेगवेगळे दिसत असले तरीही ते एकमेकांशी संलग्न आहेत. या पाच आधार स्तंभा बद्दल वाचताना लेखक आपल्या दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन ही पाच तत्वे एकमेकांशी कशी संलग्न आहेत हे सिद्ध करून दाखवतो आणि या वरून लेखकाचा मानसशास्त्राचा चांगला अभ्यास आहे हे दिसून येतं. लेखक मानसशास्त्रांच्या विविध संकल्पना मांडताना प्रसिद्ध अशा मानसोपचारतज्ज्ञांचे व त्यांच्या अभ्यास पद्धतीचे दाखले देतो.

समाजात एकेका कालखंडात काही विशिष्ट व्यक्ती जन्माला येतात व घडतात आणि त्या संपूर्ण समाजाकरिता दीपस्तंभाप्रमाणे असतात. लेखक अशा दीपस्तंभा समान व्यक्तिमत्त्वांची आंतरिक रचना व जडणघडण कशी झाली, तथा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या विविध वलय कोणती? याचा शरीरशास्त्र, वेदांत तत्वज्ञान व मानसशास्त्र या तिन्ही विषयांचा एकत्रितपणे आधार घेऊन आपल्याला आपल्याला समजावून सांगतो. तसेच लेखक मेंदूची रचना व त्याचं कार्य तथा व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या विविध वलयांची कार्यपद्धती व विविध वलयात होणाऱ्या प्रक्रिया यांच्यावर देखील भाष्य करतो.

मानवी विकासात शिक्षणाचा सर्वात मोठा वाटा आहे. माणूस दैनंदिन जीवनात कळत नकळत शिकतच असतो. थोडक्यात मानवाच्या शेवटच्या श्वासा पर्यंत ज्ञान मिळवण्याची प्रकिया ही अविरत सुरूच असते आणि त्यात कुठेही खंड पडत नसतो. 'आचरण', 'प्रतिसाद' आणि 'कृतिशीलता' हे कोणत्याही शिकण्याचा प्रक्रियेतील महत्वाचे घटक असतात. शिकण्याच्या प्रक्रियेत 'स्वाध्यायाला' भरपूर महत्व आहे. वाचकांना शिकण्याची प्रक्रिया नीट समजावी म्हणून लेखकाने शिकण्याचा प्रक्रियेतील प्रसिद्ध अशा विविध तंत्रांबाबत व टप्प्यांबाबत माहिती दिली आहे. आता ज्ञान तर मिळवलं विषय तर समजला पण जर योग्य वेळी जर त्या ज्ञानाचं स्मरण आपल्याला झालं नाही तर आपली अवस्था ही जमिनीत चाक अडकलेल्या महारथी कर्णासारखी होते, म्हणून लेखक स्वाध्यायासोबत पुनः स्मरणाला देखील महत्व देतो.

शिकण्याच्या प्रक्रियेत एकाग्रतेला फार महत्व आहे. एकाग्रता आणि कार्यकुशलता यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे या पुस्तकात तुम्हाला समजेल. जसं हल्ली टी २० क्रिकेट मध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्ही किती धावा काढता किंवा प्रतिस्पर्धी संघाचे किती बळी घेता यावर तुमचा विजय अथवा पराजय निश्चित असतो त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यातील पहिली २५ वर्षं हे आपलं जीवन घडवत असतात. या सुरुवातीच्या पंचवीस वर्षात स्वतःचा, आपापल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा, तसेच या जडणघडणीच्या वर्षात येणारे अनुभव, संधी याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा या बद्दल लेखक मार्गदर्शन करतात.

यशस्वी माणसांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये एक मूलभूत फरक असतो आणि तो म्हणजे त्यांच्या आयुष्याचं एक उद्दिष्ट असतं, त्यांच्या समोर एक ध्येय असतं, त्यांची काही स्वप्न असतात. निसर्गाचा खेळ पण विचित्र आहे काही माणसांकडे सगळी गुण कौशल्य असतात पण त्यांच्या आयुष्यात ध्येयाची कमतरता असते आणि काही जणांच्या बाबतीत याचा बरोबर उलटं असतं. लेखकाने आधीच्या प्रकरणात गुण कौशल्या बद्दल ते कसे विकिसित करावे या बद्दल विचार व्यक्त केले आहेत तसेच पुढच्या प्रकरणात 'स्व ची ओळख' कशी करावी आणि त्यावरून ध्येयनिश्चिती कशी करावी या बद्दल भाष्य केलेलं आहे. ध्येयनिश्चिती झाली असली तरी कोणत्या दिशेने त्या ध्येयाकडे वाटचाल करावी, वाटचाल करताना येणारे अडथळे, संभ्रम यांना सामोरं जाऊन त्यावर कशी मात करायची या बद्दल लेखक त्याचे विचार मांडतो.

जसं आयुष्यात ध्येयनिश्चिती महत्वाची असते तसेच कार्यक्षेत्रं निवडणं देखील महत्वाचं असतं. कार्यक्षेत्राची निवड करताना आपली आवड, त्या कार्यक्षेत्रात काम करताना लागणारी गुण कौशल्य आत्मसात करणं, आपल्या कार्यक्षेत्रात दररोज होणाऱ्या बदलांचा सतत पाठपुरावा कसा करावा या बद्दल लेखक उदाहरणं देऊन समजावून सांगतो. कार्यक्षेत्राच्या निवडी नंतर अजून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे समय व्यवस्थापन आणि आपलं लक्ष विचलित न होऊ देणं, आणि या दोन्ही गोष्टी कशा करायचा या बद्दल लेखक मार्गदर्शन करतो.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण म्हणू तशी होत नाही. काहीवेळेला आपण जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर अपेक्षित यश नाही मिळालं तर माणूस दुखी होतो प्रयत्न करायचे सोडून देतो. अशावेळी धैर्य न सोडता सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन योग्य मार्ग कसा निवडावा हे लेखक समजावून सांगतो. माणसाची ही नेहमीची सवय आहे की जिंकल्यानंतर अथवा यशस्वी झाल्यानंतर मी काय करेन याची यादी त्याच्याकडे तयार असते पण जर आपण अपयशी झालो तर ते अपयश कसं पचवायचं, परत ध्येयप्राप्ती करता जोराने प्रयत्न कसे करायचे, आत्मा परीक्षण कसं करायचं या बद्दल तो काहीही विचार करत नाही. लेखक नेमका हाच मुद्दा अगदी विस्तारपूर्वक समजावून सांगतो.

जसं शिकण्यासाठी वयाची अट नसते तसेच स्वतः मध्ये बदल करण्यासाठी ही वयाची अट नसते. आपली समस्या हीच आहे की आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं ही बाहेर पाहतो पण गरज असते ती आपल्या अंतरंगात डोकावून पाहण्याची, जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होतात. जो पर्यंत माणूस जिवंत आहे तो पर्यंत त्याच्या कडे अनंत संधी उपलब्ध आहेत, त्यामुळेच हे पुस्तक सर्व वयोगटांसाठी आहे. ज्यांना त्यांचा मध्ये सकारात्मक बदल करायचे आहेत अशा लोकांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आहे. 

पुस्तकाचं नाव : माणूस नावाचं सुंदर शिल्प

लेखक: कर्नल (निवृत्त) पी. पी. मराठे

प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स

पृष्ठ संख्या: १६९

© वेदांग देशपांडे

२६/०१/२०२५

Comments

  1. Khup chaan book aahe. Insights Chaan establish kelya aahes!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Social Media : The Another Realm

India vs Pakistan Asia Cup 2022 : Some Improvements & Some Iteration Of Past Mistakes