भारतीय ज्ञान परंपरेत "अनावश्यक" वाटत असलेल्या "पौराणिक कथांची" आवश्यकता.
३ डिसेंबर २०२३ चा रविवार महाराष्ट्र टाइम्स वाचत असताना दुसऱ्याच पानावर एक बातमी वाचली त्याचं शीर्षक होतं "ज्ञानपरंपरेत पुराणकथा नकोत". हे शीर्षक वाचताक्षणी ठरवलं की आता पूर्ण बातमी वाचायचीच. बातमीच्या सुरुवातीलाच "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमात पौराणिक कथांचा समावेश न करता सांस्कृतिक वारसा, नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती, पुरातन जीवन शैली, थोर शास्त्रज्ञांचा अभ्यास या घटकांचा समावेश करणे अपेक्षित आहे" असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. पूर्ण बातमी वाचून झाल्यानंतर देखील बराच वेळ डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल विचार चालू होता. साहजिकच मला पहिला प्रश्न हा पडला की भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमात पुराणकथा नकोत असं डॉ नितीन करमळकर का बोलले असावेत ?
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री नितीन करमळकर |
मला वैयक्तिक पातळीवर तरी डॉ नितीन करमळकर यांचं हे वक्तव्य अजिबात पटलेलं नाही. आता डॉ. करमळकरांचं मत का पटलं नाही यासाठी आधी आपल्याला “Indian Knowledge system” अर्थात भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय ते आधी समजून घेणं गरजेचं आहे. २०२० साली मोदी सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं व या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मध्ये त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश केला. भारतीय ज्ञान परंपरा ही "ज्ञान", "विज्ञान" व "जीवन दर्शन" या त्रिसूत्रीवर आधारित आहे. हे प्राचीन व अमूल्य असलेलं भारतीय ज्ञान, विज्ञान व जीवन दर्शन यामधील संकल्पना भविष्यात जतन करता याव्यात व देशाच्या येणाऱ्या पिढ्यांना अगदी साध्यासोप्या भाषेत समजून सांगता याव्यात तथा हस्तांतरित करता याव्यात हा भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य हेतू होय.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमात गणित, खगोलशाश्त्र, योग, कला व संस्कृती, वेद उपनिषद व पुराण यांचं तत्वज्ञान असे विविध घटकांचा समावेश केला गेला आहे. डॉ करमळकर त्यांचं मत मांडताना हे देखील म्हणाले होते की "आपल्या जीवनात नदीला अनन्यसाधारण महत्व आहे नदीच्या खोऱ्यात आपल्याला प्राचीन मंदिरं, जीवनशैली, विविध संस्कृती पाहायला मिळतात व अनेक तीर्थक्षेत्रे देखील नदीच्या परिसरात वसलेली आहेत.
आता आपण उदाहरण म्हणून भारतातलं कोणतं ही प्राचीन मंदिर घेतलं तर त्या मंदिराशी निगडित काही महत्वाचे घटक असतात पहिला घटक म्हणजे त्या मंदिरातील देवी/देवता, दुसरा घटक त्या तीर्थक्षेत्राचं स्थानमाहात्म्य, तिसरा घटक म्हणजे त्या देवी-देवतेशी निगडित पौराणिक कथा, चौथा घटक म्हणजे त्या देवी-देवतेच्या उपासने संदर्भात उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा व त्या ग्रंथसंपदेचा साधा सोप्या सरळ भाषेतला भावार्थ, व पाचवा घटक म्हणजे त्या देवी-देवतेशी निगडित अध्यात्मिक अनुभूती.
पुराणात पौराणिक कथा आहेत ज्या या विश्वाच्या उत्पत्ती बद्दल माहिती देतात ज्याला "सर्ग" असं म्हणतात तर या पौराणिक कथांमध्ये विविध देव-देवता, राजा व ऋषी यांच्या वंशावळी देखील दिलेल्या आहेत ज्याला "वंश" असं म्हणतात आणि या पौराणिक कथांमध्ये या विश्वाचा नाश कसा होईल याचा बद्दल माहिती दिलेली आहे ज्याला "प्रतिसर्ग" असं म्हणतात. पुराणांना पाचवा वेद म्हणून देखील ओळखलं जातं.
आता या पौराणिक कथांचं खरंच काही महत्व आहे का ? का उगाच जुन्याकाळी त्या मानवाच्या मनोरंजनासाठी सांगितल्या गेल्या होत्या? जशी हाताची पाचही बोटं सारखी नसतात तशी सर्व माणसांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता सारखी नसते. लहान मूल म्हणजे शेणामातीचे गोळे असतात त्यांच्यावर तुम्ही लहानपणापासून कोणते संस्कार करता या वर त्यांची भविष्यातील जडण घडण अवलंबून असते. लहान पोरांना संध्याकाळी दिवेलागणीच्यावेळी प्रार्थना करायला सांगितली तर ते पटकन ऐकणार नाहीत पण जर तुम्ही त्यांना सांगितलं की सायं प्रार्थना झाल्यावर तुला मी एक पौराणिक गोष्ट सांगेन तर निदान ती गोष्ट ऐकण्याच्या उत्सुक्तेपोटी तरी ते सायं प्रार्थना करतील. यात एकीकडे त्यांच्या वर चांगले संस्कार पण होतील आणि दुसरीकडे त्यांना नकळत आपल्या हिंदू धर्माबद्दल धर्मशिक्षण मिळेल व त्यांची स्वधर्माबद्दलची श्रद्धा आणखी बळकट होईल.
जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं त्यांच्या अध्यात्मिकतेकडे असलेल्या रुचीनुसार त्याची अध्यात्मिक पातळी ठरते. प्रत्येक माणसाची अध्यात्मिक पातळी ही वेगळी असते, कारण तो शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा व साधनेचा भाग. कोणत्याही देवी-देवतांशी निगडित पौराणिक कथा या अध्यात्मिकतेच्या इमारतीचा पाया आहेत. या अध्यात्मिकतेच्या इमारतीचा पुढचा स्तर म्हणजे त्या देवी-देवतेच्या उपासने संदर्भात उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करून त्या ग्रंथसंपदेचा भावार्थ जाणून त्या देवी-देवतेशी एकरूप होण्याचा मार्ग शोधून काढणे व नंतर त्या मार्गावर आपली अध्यात्मिक वाटचाल सुरु ठेवणे.
आता एकदा का देवी-देवते बद्दल आपली श्रद्धा बळकट झाली, त्या देवी-देवतेशी एकरूप होण्याच्या मार्गावर आपली वाटचाल सुरु झाली की पुढचा स्तर येतो तो म्हणजे अध्यात्मिक अनुभूतीचा. आता या अध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घ्यायचा कसा? तर आधी देवी-देवतेबद्दलची श्रद्धा बळकट करायची त्यानंतर त्या देवी-देवतेशी निगडित असलेल्या ग्रंथसंपदेचा भावार्थ जाणून घ्यायचा व एकदा का तो भावार्थ जाणून घेतला की त्या भावार्थापासून मिळालेला बोध आपल्या दैनंदिन जीवनात किंवा प्रपंचात आपल्याला कसा अमलात आणता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. हा भावार्थापासून मिळालेला बोध आपल्या प्रपंचात प्रामाणिकपणे अमलात आणण्याचा प्रयत्न करणे याला "साधना" असे म्हणतात. ही साधना प्रामाणिकपणे निरंतर चालू ठेवली की आपले अंतःकरण अर्थात चित्त हे अंतर्बाह्य शुद्ध होते व तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या कृपेने अध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव येतो.
त्यामुळे देवी-देवतेबद्दल श्रद्धा बळकट करणे, देवी-देवते संदर्भात उपलब्ध असलेला भावार्थ जाणून घेणे, व तो भावार्थ प्रपंचात अमलात आणणे या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला लक्षात येईल की ती एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया अगदी छोट्या गोष्टीने अर्थात पौराणिक कथांच्या श्रवणाने सुरु होते. त्यामुळे "श्रद्धा-भावार्थबोध-अनुभूती" ही त्रिसूत्री फक्त अध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी नाही तर कोणतं ही ज्ञान संपादन करण्यासाठी ही अगदी योग्य पद्धत आहे.
पौराणिक कथांची आवश्यकता भारतीय ज्ञान परंपरेत का आहे हे आपण काही उदाहरणं घेऊन समजून घेऊ. समजा तुम्ही कर्नाटक मधल्या पट्टदक्कल येथील विरुपाक्ष मंदिराचा भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहात आणि अचानक तुम्हाला तिथे पुराण काळातील घडलेला "समुद्र मंथनाचा" प्रसंग असलेलं शिल्प दिसलं तर केवळ हा पुराण काळातील प्रसंग आहे म्हणून हा कालबाह्य आहे व त्याचं काही महत्व नाही असा विचार करून जर तुम्ही भारतातील प्राचीन मंदिरांचा भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात.
पट्टदक्कल येथील विरुपाक्ष मंदिरात पुराणकाळातील घडलेला समुद्र मंथना प्रसंग दाखवणारे शिल्प |
दुसरं उदाहरण म्हणजे महर्षी पतंजली यांचं, जर तुम्ही पातंजल योग शाश्त्राचा भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असाल आणि कोणत्या प्राचीन मंदिरात तुम्हाला नागरूपात पतंजलींची मूर्ती दिसली आणि जर तुम्ही तुमच्या अभ्यासाची सुरुवात महर्षी पतंजली यांच्याशी निगडित पौराणिक कथा समजून न घेता केली तर तुमच्या या अभ्यासाला काही अर्थ नाही. या वरील मांडलेल्या दोन उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं की पौराणिक कथा या भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाचा गाभा आहे, पाया आहे त्याला डावलून चालणार नाही आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना "श्रद्धा-भावार्थबोध-अनुभूती" ही त्रिसूत्री वापरणं अनिर्वार्य आहे.
Comments
Post a Comment