माणूस नावाचं सुंदर शिल्प: यशाची व व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली
पुस्तकाचे लेखक हे भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल आहेत. १९७१ साली ते भारतीय सेनेत जेव्हा अधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा पासून 'मानवी विकास आणि प्रतिसाद' हा त्यांचा आवडीचा विषय आहे. लेखकाने आयुष्यातील वेगवेळ्या टप्प्यांवर म्हणजेच बालपणापासून ते प्रौढत्वा पर्यंत माणसाच्या वागण्याचा, स्वभावाचा व तो देत असलेल्या प्रतिसादाचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं आणि माणसातले गुण-दोष हे अधून मधून डोकं वर काढतात. पण जर मुक्या प्राण्यांना प्रशिक्षण देऊन बदलता येऊ शकतं तर हे माणसाच्या बाबतीत पण सहज शक्य आहे. आणि या सकारात्मक बदला करता गरज आहे चांगल्या वातावरणाची आणि सहेतुक व सातत्यपूर्ण परिश्रमाची. हल्लीच्या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला एका विशिष्ठ चौकटीत बांधून ठेवलं आहे. अमुक अमुक एक अभ्यासक्रम आणि अमुक अमुक एवढे गुण तुला परीक्षेत मिळाले की तू हुशार. थोडक्यात सांगायचं झालं तर आजची शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी नाही तर परीक्षार्थी घडवत आहे. एक चांगला विद्यार्थी असणं हे सुजाण नागरिक होण्याच्या प्रक्रियेतील पाहिलं पाऊल आहे. लेखकाच्या अनुस...